जैन हिल्सला ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवसात जैन हिल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेत ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या दशकात जैन स्वीट ऑरेंजच्या माध्यमातून जैन इरिगेशनसारखी खासगी संस्था प्रभावी संशोधन करीत आहे ते शेतकऱ्यांसाठी मौलीक अशी गोष्ट आहे, असे सांगत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना चांगल्यात चांगली रोपे उपलब्ध करुन द्यावी, असे मत परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी व्यक्त केले.
देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ तांत्रिक सादरीकरणावेळी ते बोलत होते. बडिहांडा सभागृह आणि परिश्रम सभागृहात ‘तांत्रिक सत्र’ झाले. याच परिषदेचा एक भाग म्हणून जैन संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील जैन स्वीट ऑरेंज च्या मातृवृक्ष ग्रीन हाऊस, मोसंबी लागवड क्षेत्र तसेच फळ प्रक्रिया उद्योग यासह क्लायमेंट स्मार्ट टेक्नॉलॉजीची प्रात्यक्षिके सर्व अभ्यासकांनी अनुभवली.
जैन हिल्सवर बघितलेली हायटेक प्लॉट फॅक्टरी ही गुणवत्तापूर्ण रोप निर्माण करत आहे. ते शेतकऱ्यांसाठी वन स्टॉफ सोल्यूशन ठरू शकते, असे मत इस्त्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका यांनी व्यक्त केले. सिट्रस पिकांवरील कीड व रोगांचे निदान, निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी नवोन्मेषी रणनीती. हे सत्र परिश्रम सभागृहात झाले. सत्राचे अध्यक्षपद डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी भूषविले तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. एम. कृष्णा रेड्डी, डॉ. संदीप सिंग होते. सत्राचे समन्वयक म्हणून डॉ. वाय. व्ही. इंगळे, डॉ. आशिष वारघणे यांनी काम पाहिले. जैविक कीटकनाशके (बायोपेस्टिसाइड्स) हे शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे साधन आहे. रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक पर्यायांचा अवलंब करण्यावर भर देताना, भारताने ब्राझीलसारख्या देशांच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करावा आणि स्थानिक गरजेनुसार उपाय विकसित करावेत, असे संजीव कुमार यांनी सादरीकरण केले. ड्रोन इमेजिंग आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लिंबूवर्गीय फळांवरील ‘HLB’ रोगाचे अचूक निदान; संशोधनात या आधुनिक तंत्राचा चपखल वापर कसा करावा या बाबत डॉ. विशाल काळबांडे यांनी सविस्तर सांगितले.
संपूर्ण भारतातील लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन
परिषदेच्या उद्घाटनस्थळी संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळे तसेच जैन इरिगेशनने विकसित केलेल्या ३४ वाणांची मांडणी याठिकाणी केली होती. एकाच छताखाली इतक्या व्हरायटी अभ्यासकांना बघण्याची संधी जैन हिल्स येथे उपलब्ध केली होती.
अभ्यासकांचे संशोधन पेपर्स पोस्टर्सचे प्रदर्शन
जैन हिल्स येथील परिश्रम हॉलच्या तळमजल्यावर संशोधन पोस्टर्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. त्यात २० निरनिराळ्या महत्त्वाच्या संत्रा मोसंबी संदर्भात आपले संशोधन पोस्टर्स सादर केलेले आहेत. काही महत्त्वाच्या, लक्षवेधी पोस्टर्सची माहिती प्रदर्शित आहे. नारंगी, मोसंबी आदी लिंबूवर्गीय फळांवर प्रक्रियेत शिल्लक राहिलेले साल‑बिया‑गराचा कचरा अन्नउद्योगासाठी महत्त्वाचे पोषक द्रव्य आणि जैव सक्रिय घटक देऊ शकतो, या संकल्पनेवर आधारित संशोधन पोस्टर अभ्यासकांनी मांडले होते.
