ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ; पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
साईमत/ पहूर ता. जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील पहूर येथे वाघूर नदीच्या पात्रात गावातील नाल्यांमधील सांडपाणी व कचरा थेट टाकला जात असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘नमामि गंगे’ अभियान राबविण्यात येत असून नद्यांचे संवर्धन व स्वच्छता हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, पहूर येथील वाघूर नदीत वर्षानुवर्षे गावातील सांडपाणी सोडले जात असून, आता त्यात भर म्हणून नाल्यांमधील केरकचरा व उकिरडा थेट नदीपात्रात टाकला जात आहे. परिणामी नदीचे स्वरूप पूर्णतः दूषित झाले असून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने तातडीने याकडे लक्ष देऊन नदीपात्राची स्वच्छता करावी तसेच नदी स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरण व स्वच्छतेचे काम करण्यात आले होते. मात्र सध्या पुन्हा नदी दूषित झाल्याने त्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे वाघूर नदीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
