बनावट घरकुलांवरून चौकशीची मागणी तीव्र
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याची गंभीर चर्चा ग्रामीण जनतेत रंगू लागली आहे. सरकारी कागदोपत्री कामे जलद गतीने सुरू असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही गावांमध्ये घरकुलाचे काम न सुरू होता देखील संपूर्ण रक्कम लाभार्थ्यांना मिळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
घरकुल योजनेचा उद्देश गोरगरिबांना सक्षम घर उपलब्ध करून देणे हा असताना, काही गावांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, शिपाई तसेच संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट तपासण्या करून मंजुरी मिळविल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात बांधकाम नसतानाही काही ठिकाणी घरांचे फोटो काढून प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत.मुक्ताईनगर पंचायत समितीत पीएम आवास योजनेसाठी तीन अभियंते कार्यरत आहेत.
यातील प्रत्येक अभियंत्याकडे सरासरी १० ते १५ गावांची जबाबदारी आहे. मात्र, या गावांपैकी काही ठिकाणी प्रत्यक्ष घरकुल न उभारता हप्ते मंजूर झाल्याचे उदाहरण समोर आल्याने लाभार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने संपूर्ण कामांची तपासणी करावी, प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता पडताळावी, तसेच दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शासनाची महत्वाकांक्षी योजना पारदर्शकपणे व न्याय्य रीतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी वेळेत वस्तुस्थितीचा उलगडा होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
