साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रलंबित निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा जोरदारपणे प्रतिध्वनित झाला. विधानपरिषदेत आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित करत शासनाची ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
खडसे म्हणाले, “अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान तसेच लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. मात्र अद्यापही निर्णय न झाल्याने सेवानिवृत्त व कार्यरत सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे.”
ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास अनेक सेविकांच्या परिस्थितीचे गंभीर चित्र समोर आले असून, आर्थिक मदत तातडीने न मिळाल्यास प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यापूर्वीही राज्यभरातील सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्हा परिषदेसह अनेक ठिकाणी मोर्चे काढत आंदोलने केली होती. निवृत्तीवेतन, उपदान, प्रोत्साहन भत्ता तातडीने वितरीत करावा, या मागणीला आजही न्याय मिळालेला नाही, असे खडसे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या,
“अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे सेवानिवृत्तीनंतर एकरकमी लाभ देण्यात येतो. पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे.”
तसेच, लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता सेविकांना वितरीत करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खडसे यांनी वित्त विभागाला सूचना देऊन निर्णय प्रक्रियेचा वेग वाढवावा, तसेच सेविकांच्या जीवनावश्यक मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी अधिवेशनात केली.
