
साईमत मालेगाव प्रतिनिधी
डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येने संपूर्ण मालेगाव हादरून गेले असून शहरात आज भीषण संताप उसळला. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांनी एकत्र येत मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आरोपीला तात्काळ फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी केली.
बंददरम्यान काढलेल्या निषेध मोर्चाने अचानक आक्रमक वळण घेतले. विकृत मानसिकतेच्या आरोपीस न्याय मिळावा यासाठी लोकांच्या भावना तीव्र झाल्या. आंदोलकांनी “आरोपीला फाशी द्या” अशा घोषणा देत मालेगाव न्यायालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाने काही वेळातच न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न करत परिसरात प्रचंड तणाव निर्माण केला.
दरम्यान, आज या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार होते. मात्र वाढता जनक्षोभ, संतप्त नागरिकांचा आक्रोश आणि परिसरातील तणाव पाहता पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली. कोर्टाच्या आवारात जमलेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. परिसरातील शेकडो नागरिक “चिमुकलीचा बदला – फाशीच”, “आरोपीला आमच्या ताब्यात द्या”, “न्याय हवा, अन्याय नको” अशा घोषणा देत न्यायाची मागणी करत होते.
मोर्चा संपल्यानंतरही नागरिकांचा संताप ओसरला नाही. हातात निषेधाचे फलक, काळे पट्टे आणि बॅनर घेऊन लोक न्यायाची मागणी करत राहिले. मालेगाव शहरात हळूहळू वातावरण अधिक तापत गेले असून सर्वत्र हळहळ, दु:ख आणि संतापाचे सावट पसरले आहे.
निष्पाप बालिकेच्या हत्येनंतर संपूर्ण शहरात एकच मागणी घुमत आहे—
“आरोपीला फासावर चढवा… तोपर्यंत मन शांत होणार नाही!”
सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. पोलीस यंत्रणेने अतिरिक्त कुमक पाचारण करून परिसरात सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे.


