
छावा मराठा युवा महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. याप्रकरणी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा मराठा युवा महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामीण भागातील बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे समोर आला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. समाजातील महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांना देण्यात आले.
निवेदन देतांना छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकूर, आघाडीच्या महानगर उपाध्यक्ष विद्या झनके, योगिता वाघ, उज्ज्वला सपकाळे, शारदा तायडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सागर साळुंखे, आनंद महिरे, भीमराव सोनवणे, कैलास पवार, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


