
पाचोरा पोलिसांची कारवाई; ४१,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
तालुक्यातील भातखंडे खुर्द येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात पाचोरा पोलिसांनी केवळ चार तासांत आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या जलदगती कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) हे दि.१० नोव्हेंबर रोजी लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून ४१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती.
या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, त्याच दिवशी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीव्दारे कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५,रा.भातखंडे खुर्द) या संशयित तरुणाला पोलिसांनी तत्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरी केलेला ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ, पोलीस नाईक महेंद्र पाटील, तुषार विसपुते, पोकॉ संदीप राजपूत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंपी, संतोष राजपूत आणि अनिल पवार यांच्या पथकाने केली.


