
कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून केळी व्यापारी मातीमोल दरात
साईमत/यावल/प्रतिनिधी :
कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून केळी व्यापारी मातीमोल दरात केळीची खरेदी करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून आल्याने काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्याच पाश्वभूमिवर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा काढल्याची माहिती सभापती राकेश फेगडे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, जळगाव यांनी यावल येथे केळी भावाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी,शेतकरी व बाजार समिती यांची सामायिक सभा घेतली होती. त्यात त्यांनी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करण्यात यावी व दोषी आढळून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले होते. त्याच्याच पुढचे पाऊल म्हणून आता बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा बजावल्या आहेत.त्यात केळी हिशेब पुस्तके, बॅंकेचे अद्ययावत पासबूक किंवा स्टेटमेंट उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. दप्तर तपासणी आणि कारवाई होण्याच्या धाकाने व्यापारी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागून आहे.
बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीस बजावलेल्या आहेत. त्यात दोषी आढळून आलेल्या व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विपणन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील तरतुदींनुसार ठोस कारवाई करणार आहे. केळीच्या दरातल्या तफावतीवर निश्चित तोडगा काढण्यासाठी ही कार्यवाही आहे.राकेश फेगडे, सभापती


