शासनाच्या हमीभावाने ज्वारी, मका, बाजरीची खरेदी : शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी शासनाच्या किमान आधारभूत किंमत (हमीभाव) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार हमीभाव ज्वारी तीन हजार ६९९, मका दोन हजार ४००, बाजरी दोन हजार ७७५ रूपये निश्चित केल्याचे पणन महासंघाचे संचालक तथा मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी सांगितले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत खरीप हंगामातील खरेदीसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यास अनुसरून जिल्हा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी भरडधान्य खरेदी केंद्र प्रस्ताव सादर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीला १७ खरेदी केंद्रांना मंजुरी बाबत प्रस्ताव दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात मंजूर केंद्रांमध्ये अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाळधी, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव यांचा समावेश आहे. या निर्णयाबाबत खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने केली जाणार असून, प्रत्येक केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाई न नोंदणी तात्काळ सुरु करण्यात येईल. त्यांनी नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून शासनाच्या हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी शेतकऱ्यांना केले आहे.



