तीन हजार ३१३ हरकतींपैकी दोन हजार ५१ मान्य ; एक हजार २६२ हरकती फेटाळल्या
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात दाखल झालेल्या तीन हजार ३१३ हरकतींपैकी दोन हजार ५१ हरकती मान्य केल्या असून एक हजार २६२ हरकती फेटाळल्या आहेत. तसेच यंदा पाच हजार ४६९ नव्या मतदारांची भर पडली आहे.
गेल्या चार वर्षांपासून पारोळा नगरपरिषद प्रशासकांकडे आहे. मुदत संपलेली निवडणूक कधी लागणार, याकडे शहरातील नागरिकांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून होते. आगामी निवडणुकीसाठी जुलै २०२५ अखेर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. यादीवर शहरातील तीन हजार ३१३ नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या. सर्व हरकतींची तपासणी प्रांताधिकारी निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी किशोर चव्हाण आणि नगरपालिका प्रशासनाने केली. छाननीनंतर दोन हजार ५१ हरकती योग्य ठरल्या तर पुरावा अपूर्ण असल्याने एक हजार २६२ हरकती फेटाळल्या आहेत.
यंदा पाच हजार ४६९ नव्या मतदारांची वाढ
शहराची १२ प्रभागांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार असेल. अंतिम मतदार यादीत पुरुष मतदार १८ हजार ४७१, महिला मतदार १८ हजार ८२२, इतर ८ अशी एकूण मतदारसंख्या ३७ हजार ३०१ असणार आहे. विशेष म्हणजे यंदा महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा ३५१ ने जास्त आहे. २०१६ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारसंख्येत पाच हजार ४६९ ने वाढ झाली आहे. निवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



