सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोशणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
आनंदाचा आणि उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट, रोशणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, हे करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोशणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन वीज महावितरणच्यावतीने केले आहे.
दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोशणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे आर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सुलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये. आकाश कंदिल किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्री पीनचा वापर न करता वायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या साह्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंध असावी. तुटलेली किंवा सेलो टेपने जोडलेली नाही, त्याची खात्री करून घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत
विद्युत वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक विद्युत यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, त्याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. विद्युत यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५, १९००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.