जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी :
राज्य शासनाने केंद्र सरकारची नवीन पीकविमा योजना स्वीकारली असली, तरी जुन्या योजनेतील पाच निकषांपैकी फक्त पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर दिलासा देणारे उर्वरित निकष रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेतून फारसा फायदा होणार नाही, अशी भावना व्यक्त करत तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, गुरे, घरे व शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, वादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची भरपाई मिळणे कठीण झाले असून जुन्या योजनेत मिळणारे संरक्षण आता उपलब्ध नाही. पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी संदिप बाबुलाल मोराणकर, सुरेश ओंकार महालपुरे आणि अतुल नारायण सोनार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासन पातळीवर विचार करण्यात येईल व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यांनीही, शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.