पहूर येथील वाघुर नदीच्या पुलावर रहदारीला अडथळा
साईमत/पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी :
जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफवर वाघूर नदीवरील पहूर येथील पूल चक्क ‘पार्किंग’ मध्ये बदलला असून त्यामुळे महामार्गावरील रहदारीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी पहूर येथे आठवडे बाजार भरत असल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक आपली दुचाकी व चारचाकी वाहने थेट पुलावरच उभी करत आहेत. त्यामुळे पूल वाहनतळाचे रुप धारण करत असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपली वाहने बसस्थानक परिसरात व पुलावर लावू नयेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळून अपघाताचा धोका कमी होईल. स्थानिक नागरिकांच्या मते, पोलिसांनी बाजार भरलेल्या दिवशी विशेष पथक तैनात करून पुलावरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.