11 Projects In The District : जळगावकरांची चिंता मिटली…! जिल्ह्यातील ११ प्रकल्पांनी गाठली ‘शंभरी’

0
18

पाण्याचा प्रश्न मिटला ; शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाण्याची सोय

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्याच्या मोठ्या, मध्यम व लघु १७ जलस्रोत प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांनी ‘शंभरी’ गाठली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी व रब्बी हंगामाच्या सिंचनाचा प्रश्न मिटल्याचे समाधान जिल्हावासीयांमध्ये आहे. जिल्ह्यातील जलसाठा ८४.७५ टक्के इतका आहे. गिरणा धरणासह अनेक प्रमुख प्रकल्पांनी ‘शंभरी’ पूर्ण केली आहे. यंदा मान्सून सुरुवातीच्या अडीच महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी होता. ज्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, १५ ऑगस्टनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे मोठे व मध्यम प्रकल्प झपाट्याने भरले.

विशेष म्हणजे गिरणा, अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नवती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड या धरणांनी १०० टक्के जलसाठा गाठला आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ९९.८८ टक्के भरले आहे. काही तासांत शंभरी गाठण्याची अपेक्षा आहे. यंदा जलसाठ्याच्या भरभराटीमुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मागणीप्रमाणे पाणी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे काही शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये आर्थिक ताण जाणवतो आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा २२ सप्टेंबरपर्यंत असा (कंसात गतवर्षीची टक्केवारी )-

मोठ्या प्रकल्पांमध्ये हतनूर– ७१.५७ टक्के (७२.३५ टक्के), गिरणा–१०० (१००), वाघूर–९९.८८ (१००), मध्यम प्रकल्पांमध्ये अभोरा–१०० (१००), मंगरूळ– १०० (१००), हिवरा– १०० (६२.७३), सुकी–१०० (१००), मोर– ९५.१३ (९७.३५), बहुळा–६९.२८ (६६.२८), अग्नावती– १०० (१००), तोंडापूर – १०० (१००), अंजनी–६६.९२(६६.५९), गूळ–७७.२५ (८१.२२), भोकरबारी–५२.०२ (६.०६), बोरी–१०० (१००), मन्याड–१०० (७८.१०), शेळगाव बॅरेज–१६.३२ (७०.७३). जिल्ह्यातील पाण्याच्या भरभराटीमुळे शेतकरी, नागरिक व सामान्य लोकांना संपूर्ण समाधान मिळाले आहे. जलसाठ्याच्या परिस्थितीवरून येत्या हंगामासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here