साईमत प्रतिनिधी
१५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके वाहून गेली, घरांमध्ये पाणी शिरले, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेत असून शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यात गावोगाव पूरस्थिती
जामनेर तालुक्यातील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी, तोंडापूर या गावांमध्ये पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
-
नेरी बु. येथे तब्बल २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
-
नेरी दिगर येथे १५–२० घरे आणि ५ दुकाने पाण्याखाली गेली असून काही कुटुंबांना शाळांमध्ये हलवण्यात आले आहे.
-
माळपिंप्री परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
-
सुनसगाव खुर्द व बु. या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
गावोगाव रस्ते, विहिरी, नाले तुडुंब भरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाचोरा तालुक्यात शेकडो कुटुंबांचे स्थलांतर
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव व बरखेडी मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे नदी-नाले धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत.
-
शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे, वाणेगाव या ६ ते ७ गावांत पाणी शिरले.
-
अंदाजे ३५० ते ४०० कुटुंबांना सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये हलवण्यात आले आहे.
-
मौजे शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांच्या मृत्यूचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, केवळ काही तासांच्या पावसाने शेतीसकट पशुधन वाहून गेले असून त्यातून सावरणे कठीण आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात हाहाकार
मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे (वय २८) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्रशासनाने तातडीने मदत पथके पाठवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू केले आहे.
प्रशासन सज्ज – एसडीआरएफ पथके दाखल
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) धुळे येथून ३५ जवानांची दोन पथके बोलावली आहेत.
-
एक पथक जामनेर येथे,
-
तर दुसरे पथक पाचोरा येथे दाखल झाले असून तेथे बचावकार्य सुरू आहे.
तसेच महसूल, कृषी, आरोग्य, पोलीस विभागाचे अधिकारी मदतकार्यात सक्रिय सहभागी झाले आहेत.
बाधितांसाठी तातडीची मदत
पूरग्रस्तांना शाळांमध्ये निवारा देण्यात आला आहे.
-
अन्नधान्य, पिण्याचे पाणी, बिछायत व वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या आहेत.
-
नुकसानीचे पंचनामे सुरू असून शासनाकडून नुकसानभरपाई लवकरच दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालकमंत्र्यांचे आवाहन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना शांतता व संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले –
“प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचेल. अफवांवर विश्वास ठेवू नका, नदी-नाल्यांच्या जवळ जाणे टाळा. गुरेढोरे व शेतीसाहित्य सुरक्षित ठिकाणी हलवा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.”
पुढील काळजीचे निर्देश
प्रशासनाने पुढील काही दिवसांत पुन्हा पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः नदीकाठच्या व नाल्यालगतच्या भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे व प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



