श्री मंदिर जीर्णोध्दारासह सभागृह बांधकामाचा आढावा सादर
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी :
येथील बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्यावतीने रथोत्सव व वहनाला बैलजोडी लावण्यासंदर्भात आयोजित लिलावाचा कार्यक्रम बालाजी मंदिर चौकात मोठ्या चुरशित, चढाओढीने व खेळीमेळीच्या उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डी.आर.पाटील होते. ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेच्या प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर बालाजी वहनाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पाटील यांनी “श्री मंदिर जीर्णोध्दार व सभागृह बांधकामाचा आढावा” सादर केला. यावेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, सचिव प्रशांत वाणी, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, ॲड. संजय महाजन आदींनी सत्कार केला.
सालाबादप्रमाणे भानुदास विसावे यांनी लिलाव (बोली) प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांना ॲड. संजय महाजन, किरण अग्नीहोत्री यांनी सहकार्य केले. यंदाही चुरशीत होणाऱ्या लिलावात मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बोली प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. शेकडो वर्षांची रथ, पालखी, वहनोत्सवाची परंपरा यंदाही सोमवारी, २२ सप्टेंबर, ध्वजावहनापासून ते सोमवारी, ६ ऑक्टोबर पांडवसभा वहनपर्यंत तब्बल १५ दिवस आनंदी वातावरणात निघणाऱ्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. यंदाही लिलाव पारदर्शक पद्धतीने पार पडला आहे. प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रशांत वाणी, सूत्रसंचालन तथा आभार किरण वाणी यांनी मानले.