पाळधीत नेत्र तपासणी शिबिर; ५१० रुग्णांची तपासणी
साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :
जसे पाणी देणे ही माझी जबाबदारी मानली, तसेच दृष्टीदान देखिल आपली पवित्र जबाबदारी आहे. लोकांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहून खरी समाधानाची जाणीव होते. हे कार्य पुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिराप्रसंगी केले.
जिल्ह्यातील लोकसेवेच्या परंपरेत आणखी एक सुवर्ण पान जोडले गेले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून पाळधी येथे जिपीएस मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. पहाटेपासूनच गावागावातून आलेल्या नागरिकांनी शिबिरासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ७ वाजेपासून रुग्ण नोंदणी सुरू झाली व दिवसभरात तब्बल ५१० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी २१० रुग्णांना पनवेल येथील शंकरा नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. प्रत्येक रुग्णासाठी नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली. या नि:स्वार्थ उपक्रमामागे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रेरणा तसेच प्रतापराव व विक्रम पाटील यांची लोकाभिमुख वृत्ती दिसून येते.आमच्या नेत्यांमुळे आम्हाला नव्याने जगण्याची उमेद मिळाली. ‘पाणी वाला बाबा’ आता खऱ्या अर्थाने ‘दृष्टी देणारा बाबा’ झाले, असे मनोगत रुग्णांनी यावेळी कृतज्ञतेने व्यक्त केले.
शिबिर यशस्वीतेसाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी, जिपीएस मित्र परिवार व युवासेना यांनी परिश्रम घेतले. शिबिर संपल्यानंतर अनेक वृद्धांच्या डोळ्यांत नव्या उजेडाचे समाधान दिसत होते.
            


