लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयावर शिवसेना उबाठाची धडक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
रब्बी हंगामात पहिले आवर्तन जानेवारीला सोडतात, ते डिसेंबरला सोडावे, अशी मागणी घेऊन शिवसेना उबाठा गटाच्या शिष्टमंडळाने माजी खासदार उन्मेश पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, १० सप्टेंबर रोजी येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली.
गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडल्याने पाणी वाहून जात आहे. काही शेतकऱ्यांच्या पिकांची २१ दिवसाच्या खंडात वाढ खुंटली आहे. गेल्या १६ ऑगस्टला एका दिवसात ढगफुटीसारखा पाऊस पडून शेतकरी संकटात सापडला आहे. म्हणून नदीत पाणी न सोडता थेट जामदा व दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे चाऱ्यामध्ये सोडल्यास रब्बीचे पीक चांगले येण्यासाठी शक्यता आहे. म्हणून उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता भोसले यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांनी लागलीच धरणगावचे उपकार्यकारी अभियंता तुषार राजपूत यांना कॅनल रिपेअर करून दोन दिवसात पाणी सोडावे, असे भ्रमणध्वनीवरुन सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर भरणासाठी फायदा होईल. रब्बी हंगामासाठी विहिरींना पुरेसे पाणी येईल. आज २० हजार हेक्टरऐवजी १२ हजार हेक्टरला पाणी देतात. परंतु ८ हजार हेक्टरला पाणी का पोहचत नाही. त्यांच्यासाठीही उपाय योजना करावी, असे सांगितले.
शिष्टमंडळात यांचा होता सहभाग
शिष्टमंडळात माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते उन्मेश पाटील, शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा तथा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, महानगर प्रमुख शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, प्रशांत सुरडकर, प्रमोद घगे, राकेश घुगे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, दिनेश बोरसे (चाळीसगाव), निलेश महाजन, चंद्रकांत शर्मा, प्रशांत परदेशी, मकबूल पठाण (भुसावळ) यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.