केंद्रीय मंत्र्यांकडून कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, अथांग जैन यांनी स्वीकारला पुरस्कार
साईमत/नवी दिल्ली/न्यूज नेटवर्क :
नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसित करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतकऱ्यांंच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्सने गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशिनरी अँड इक्यूपमेंट लार्ज एन्टरप्राईजेस गटात उत्कृष्ट निर्यातबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार देण्यात आला.सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जैन इरिगेशनचा पुरस्कार कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि जैन फार्म फ्रेश फुड लि.चे संचालक अथांग जैन यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडून स्वीकारला.
सोहळ्यास वाणिज्य व उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल व ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्डा उपस्थित होते. जैन इरिगेशनला मिळालेला हा पुरस्कार भारताच्या अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील कंपनीच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे द्योतक आहे. अत्याधुनिक संशोधन, गुणवत्ता आणि शाश्वत कृषी विकासाच्या मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीमुळे जैन इरिगेशनने लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. तसेच जागतिक ग्राहकांचा विश्वासही संपादन केला आहे. अशा सन्मानाबद्दल कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, शुभचिंतक आणि सहकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया ही भारतातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक उत्पादक कंपन्यांच्या निर्यातीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारी प्रमुख संस्था आहे, जी दरवर्षी विविध श्रेणींमध्ये निर्यातदारांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा आणि बळ प्रदान करते.
शेतकऱ्यांसह कंपनीतील सहकाऱ्यांना पुरस्कार समर्पित
हा पुरस्कार केवळ आमच्या कंपनीचा सन्मान नाही तर भारताच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीचा गौरव आहे. आम्ही हा सन्मान देशातील शेतकऱ्यांना आणि कंपनीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो, ज्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही उपलब्धी शक्य झाली आहे. निर्यात क्षेत्रात जैन इरिगेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि ही एक सामूहिक यात्रा आहे. जी नवोन्मेष, गुणवत्ता आणि शाश्वत विकासावर आधारित आहे. अशा सन्मानामुळे भविष्यातही भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकेल, असे कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.
ईईपीसी इंडियाचे १२ हजारांहून अधिक सदस्य
ईईपीसी इंडियाची स्थापना १९५५ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत करण्यात आली. अभियांत्रिकी निर्यातीला प्रोत्साहन देणारी ही सर्वोच्च संस्था आहे. तिचे १२ हजारांहून अधिक सदस्य आहेत. ज्यात लघु व मध्यम उद्योगांचाही मोठा वाटा आहे. धोरणात्मक सल्ला, बाजारपेठ विकास, खरेदीदार-विक्रेता मेळावे व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या माध्यमातून ती निर्यातदारांना सहाय्य करते.