अविश्वास प्रस्तावाच्या सभेला सामोरे जाण्यापूर्वीच दिला राजीनामा
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
अविश्वास प्रस्ताव सभेच्या एक दिवसाआधीच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत बळीराम सोनवणे यांनी सभापती पदाचा सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आहे. सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे स्वत:हून सादर केलेल्या राजीनामा पत्रात आपण वैयक्तिक कारणास्तव तसेच आपण हा निर्णय कुणाच्याही दबावाखाली घेतलेला नसून स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, श्री.सोनवणे यांचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांनी मंजूर केला आहे.
जळगाव बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या कारभाराला कंटाळून समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी १४ संचालकांनी ६ ऑगस्ट रोजी सोनवणेंविरुध्द अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. अशा दाखल अविश्वास प्रस्तावासाठी मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित केली होती. तशा सूचना वजा मिटींगचा अजेंडाही सहकार विभागाने काढलेला होता. अशी स्थिती असतांना सभेच्या एक दिवसाआधीच सोनवणेंनी पदाचा राजीनामा १८ ऑगस्ट रोजी दिल्याने आता विश्वास प्रस्तावासाठी आज मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेची गरज राहिलेली नाही.
