The Mother’s Friend : आईच्या मित्रानेच अल्पवयीन मुलीवर केला विनयभंग

0
25

संशयित फरार, जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

शहरातील उच्चभ्रू कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्या मित्राने वारंवार विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित मित्रासह आईवरही विनयभंग आणि पोक्सो कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील उच्चभ्रू कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये मुलीसह आई-वडील वास्तव्यास आहेत. मुलीच्या आईचा मित्र तथा शहरातील कांचन नगर येथील रहिवासी मयूर रमेश शिंपी हा वारंवार घरी येत होता. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडे सात वाजता मुलीचे वडील घरी नसताना मयूर शिंपी पिझ्झा पार्सल घेऊन आला. मुलीची आई किचनमध्ये असताना त्याने पीडित मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या मुलीने आईला सांगितली. मात्र, आईने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पुन्हा मयूर घरी आला. तेव्हा पीडित मुलीने त्याला विरोध केल्यावर आईनेच मयूरच्या कृतीचे समर्थन केले. तसेच १२ जून रोजी मयूर हा मुलगी शिकत असलेल्या अकॅडमीत गेला होता. तेथील क्लासच्या जिन्यावर तिचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले, अशीही तक्रार मुलीने शहर पोलिसात दिली आहे. अशा आशयाच्या तक्रारीनंतर मयूर रमेश शिंपी आणि पीडित मुलीची आई अशा दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here