दमदार पावसाची प्रतीक्षा, उकाड्यात पडली भर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे. अशातच आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज पुन्हा हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी असणार आहे. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा वाढण्यात भर पडली आहे. यासोबतच आगामी तीन ते चार दिवस अजून उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभाग खात्याने वर्तविला आहे.
गेल्या जून महिन्यात जिल्ह्याने सरासरी गाठत १२४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. असे असले तरी जुलै महिन्याची आकडेवारी मात्र चिंताजनक आहे. अशातच १६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ६० मि.मी. पाऊस झाला आहे. जो या कालावधीतील सरासरी ९७ मि.मी.च्या तुलनेत केवळ ६२ टक्के आहे. त्याचा अर्थ जुलै महिन्यात तब्बल ३८ टक्के पावसाची तूट झाल्याचे चित्र आहे.
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण
गेल्या मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर मुख्य पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे. आता दमदार पावसाची प्रतीक्षा असताना आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अशातच एकीकडे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे तर दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.