धुळ्यातील एसीबीच्या पथकाने केली अटक
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
शहरातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला धुळ्यातील एसीबीच्या पथकाने पाच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. शुभम भिका देव (वय २८, रा.प्लॉट नंबर ११ अ, आदर्श नगर वडेल रोड, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एसीबीच्या कारवाईमुळे लाचखोर प्रचंड हादरले आहेत.
तक्रारदार यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मर्यादित मुंबई यांच्याकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगाराकामी जेसीबीसाठी कर्ज मिळण्याकरीता पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून २४ लाख ९६ हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केले होते. त्यांनी घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या १८ हप्त्यांची मुदतीत परतफेड करुन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळण्यासाठी त्यांनी १४ जुलै २०२५ रोजी महामंडळाच्या धुळे येथील कार्यालयात जावून जिल्हा समन्वयक शुभम देव यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी कर्जाचा व्याज परतावा मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तकारदाराकडून जमा केले होते. तक्रारदाराचा व्याज परताव्याचा प्रस्ताव मुंबईतील महामंडळाच्या कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम दिल्याशिवाय त्यांचा प्रस्ताव पाठविणार नाही, असे तक्रारदार यांना सांगितले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी बुधवारी, १६ जुलै रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात समक्ष येवून तकार दिली होती. त्या तक्रारीची १६ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा शुभम देव यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम त्यांनी धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर स्वीकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
