गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ दिवसांपूर्वीच धरण भरले
साईमत/साक्री/प्रतिनिधी :
पावसाळा म्हटला की, धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत रहावे, अशी अपेक्षा सर्वांनाच असते. मात्र, हेच धरण जेव्हा पावसाच्या पाण्याने अत्यल्प भरलेले दिसले की, सर्वांनाच चिंता सतावते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच चांगल्या पावसामुळे धरण क्षेत्रात जलसाठा वाढला आहे.साक्री तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण समजला जाणारा पांझरा मध्यम प्रकल्प रविवारी रात्री ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरून “ओव्हरफ्लो” झाला आहे. त्यामुळे आता धरणावर पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे. पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडल्याने लाटीपाडा धरण रविवारी १०० टक्के भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले आहे. गेल्यावर्षी ३ ऑगस्ट २०२४ रोजी पिंपळनेरचे लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, यंदा ६ जुलै रोजी लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २९ दिवस आधीच धरण भरले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततचा मुसळधार पाऊस सुरू असल्याने अवघ्या काही दिवसात लाटीपाडा धरण भरले आहे. सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. धरण भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांडव्यावरून २०८६ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यात दररोज बदल होत जाणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्यावतीने दिला आहे.
धरणामुळे परिसरातील शेतीला होतेय पाणी उपलब्ध
यापूर्वीच जामखेडी, मालनगाव, विरखेल, बुरुडखे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात दरवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळेच लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून जाते. तसेच धरणामुळे परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होत आहे. यासोबतच भूजल पातळी वाढण्यास मदत होते. अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो.