Relief For Farmers : धानसह भरडधान्याच्या खरेदीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी दिलासा

0
8

मुदत वाढीच्या निर्णयाचे मंत्र्यांसह अनेकांनी केले स्वागत

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून धानसह भरडधान्य खरेदीसाठी शासनाने यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत निश्चित केली होती. मात्र, BeAM पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा स्तरावर अनेक शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रिया प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ७ जुलै २०२५ रोजी संदर्भीय शासन निर्णयान्वये धानसह भरडधान्य खरेदीसाठीची अंतिम मुदत २० जुलै २०२५ पर्यंत वाढविली आहे. अशा मुदत वाढीच्या निर्णयाचे राज्याचे मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्य मंत्री खा.रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी स्वागत केले आहे.

मुदतवाढीच्या मागणीसंदर्भात राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. खरेदी केंद्रावर आपली धानसह भरडधान्य विक्री प्रक्रिया पूर्ण करून आधारभूत किंमतीचा लाभ मिळवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्यावतीने उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात १८ केंद्रे कार्यरत

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप पणन हंगाममधील ज्वारी, मका, बाजरी (भरडधान्य) खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यात १८ खरेदी केंद्रे कार्यरत आहेत. त्यात अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगाव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आधारकार्ड, बँकेचे पासबुक, ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, ८ अ उतारा अशी कागदपत्रे खरेदी केंद्रावर लाईव्ह फोटो देऊन नोंदणी पूर्ण करावी, असे पणन महासंघाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here