रक्तदान शिबिरात २५० बाटल्यांचे संकलन
साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :
तालुक्यातील निमझरी येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची भली मोठी रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले. तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. निमझरी येथे विठ्ठल मंदिरात मंदिर समितीचे प्रमुख तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती छगन गुजर, पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी सोय केली होती.
दर्शनार्थींची गावातील जुन्या घरापासून ते मंदिरापर्यंत भली मोठी रांग लागली होती. वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी केली. तसेच रक्तदान शिबिरात २५० बाटल्यांचे संकलन करण्यात आले. दर्शनार्थीसाठी शिरपूर आगारातून बसची व्यवस्था केली होती. भर पावसातही चिखलगारा तुडवत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने याठिकाणी आले होते. गोरख पाटील, मच्छिंद्र पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह परिवाराने व्यवस्थापन कार्यात सहभाग घेतला.