शिंदखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी :
शेतीच्या कामासाठी घेतलेल्या ट्रॅक्टरला जीपीएस यंत्रणा बसविली असल्याने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले ट्रॅक्टर पोलिसांना शोधून काढण्यात यश मिळाले. जीपीएस यंत्रणेमुळे ट्रॅक्टर चोरट्यांनी कोणत्या मार्गाने कुठपर्यंत नेले हे माहीत झाले. त्यामुळे ट्रॅक्टर शोधून काढणे सहज सोपे झाले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शहरातील जाधव नगरमध्ये कुणाल गणेश पाटील वास्तव्याला आहेत. त्यांनी शेती कामासाठी स्वराज्य कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले होते. रात्री ट्रॅक्टर घराच्या समोर असलेल्या जागेत उभे केले होते. ट्रॅक्टरला ९४२२३७०७०६ या मोबाईल क्रमांकाची जोडणी केलेले जीपीएस बसविण्यात आले होते. ट्रॅक्टर नवीनच असल्यामुळे अधिकृत नंबर मिळालेला नव्हता. अज्ञात चोरट्यांनी दुसऱ्याच दिवशी ट्रॅक्टर चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास कुणाल पाटील ट्रॅक्टर आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी घराबाहेर आले. मात्र, लावलेल्या ठिकाणी घरासमोर ट्रॅक्टर आढळून आले नाही. तात्काळ कुणाल पाटील यांनी जीपीएस यंत्रणा जोडणी केलेल्या मोबाईलवरून पाहणी केली. तेव्हा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी वरुळ, घुसरे,चौगाव या मार्गाने दोंडाईचा येथील सिंधी कॉलनीजवळील स्टार्च फॅक्टरीजवळ ट्रॅक्टरने आपले लोकेशन दाखविले.
पोलीस कॉन्स्टेबल शेख, रुपेश चौधरी तसेच कुणाल पाटील हे तात्काळ मोबाईलमध्ये दाखवत असलेल्या लोकेशनपर्यंत पोहोचले. तेव्हा ट्रॅक्टर त्याठिकाणी आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर पळून नेण्याचा असफल प्रयत्न केला. ट्रॅक्टरला बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेमुळे ट्रॅक्टर शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, ट्रॅक्टर पळून नेणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याची मागणी फिर्यादी तथा ट्रॅक्टरचे मालक कुणाल गणेश पाटील यांनी केली आहे.