Dhule District On Monday : धुळे जिल्ह्यात सोमवारी ‘शाळा प्रवेशोत्सव’ जल्लोषात साजरा होणार

0
12

शाळांमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकारी करणार नवागतांचे स्वागत

साईमत/धुळे/प्रतिनिधी :

राज्यातील शाळांमध्ये सोमवारी, १६ जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त शासनाच्या शिक्षण विभागामार्फत ‌‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम उत्साहात, प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरावरून १०० शाळांमध्ये तर प्रत्येक तालुक्यात १०० याप्रमाणे ५०० शाळांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सवाची तयारी केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सवासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जल्लोषात तयारी केली आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधित विभागांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेस भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे रांगोळी, तोरण, पुष्पवर्षाव, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी होणार आहे. ‘एक पेड माॅ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण व गोड जेवणही दिले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करणे आणि सर्व पात्र मुलांना शाळेत प्रवेश दिल्याची खातरजमा करण्यात येत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्याची दक्षता घेण्यात येत आहेत. जे अधिकारी शाळेत जातील, त्यांनी वर्गखोल्या, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा, पोषण आहार, क्रीडांगण आदींचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना स्वच्छता, वाचन, सांस्कृतिक उपक्रम, खेळ, आणि शैक्षणिक प्रगतीबाबत प्रेरित करणे, महिला बचतगट, युवक मंडळे, स्थानिक संस्था, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. दरम्यान, १२ ते १४ जूनदरम्यान शाळांची स्वच्छता आणि सुशोभीकरण केले आहे. जिल्हा परिषद, समाजकल्याण, आदिवासी विकास, नगरपरिषदेच्या आश्रमशाळांना विशेष भेटी देण्याचे नियोजन केले आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये तर तालुकास्तरावर ४०० शाळांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.

सर्व शाळांमध्ये गणवेशासह शूज, सॉक्स उपलब्ध

जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक मागणीच्या ९९.९५ टक्के प्राप्त झाली आहे.सर्व प्राथमिक शाळांपर्यंत पोहच झाली आहे. शासन पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित आश्रमशाळा, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना मोफत पुरविते. तसेच मोफत गणवेश योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी ६०० रूपये व शूज, सॉक्ससाठी प्रति विद्यार्थी १७० रूपये याप्रमाणे निधी प्राप्त झाला आहे. तो गटस्तरावर वितरित केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून खरेदीची प्रक्रिया करून, बील पुरवठाधारकाच्या बॅंक खाती गटस्तरावरून पीएफएमएस प्रणालीद्वारे अदा केले जाते. यंदा गणवेशाचा रंग, दर्जा ठरविण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. १४ जूनपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेशासह शूज, सॉक्स उपलब्ध झाली आहे.

शिरपूर तालुक्यातील सुळे जि.प.शाळेची पटसंख्या सर्वाधिक

जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा ७३ आहे. त्यांच्यासोबत पेसा कायद्यानुसार ५१ मानधनावरील शिक्षक दिले आहेत. उर्वरित शिक्षकांसोबतही मानधनावरील शिक्षकांची नेमणूक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या पटानुसार जिल्हा परिषदेच्या १ ते १० पटाच्या २७, ११ ते २० पटाच्या ७५, २१ ते ५० पटाच्या ४२७, ५१ ते १०० पटाच्या ३१८, १०१ ते २०० पटाच्या २०३, व २०० पेक्षा अधिक पटाच्या ५४ शाळा आहे. त्यातील शाळा पीएमश्री आहेत. शिरपूर तालुक्यातील सुळे जि.प.शाळा ही सर्वात जास्त ४१६ पटसंख्येची असलेली शाळा आहे.

शिक्षणाची गंगा घराघरात पोहचविण्याचा संकल्प

शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. पहिल्या दिवशी स्वागत हा नव्या वाटचालीचा आरंभ असतो, असे म्हणत शासनाने उपक्रमासाठी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणाची गंगा घराघरात पोहचविण्याचा संकल्प प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून दृढ करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी डाॅ.किरण कुंवर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here