शहरातील प्रभाग चारमधील उद्यान विकासाच्या भूमिपूजनप्रसंगी प्रतिपादन
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
नागरिकांसाठी मूलभूत सोयी-सुविधांची पूर्ती झाली म्हणजे विकास झाला, असे होत नाही. धुळे शहराच्या विकासाला उद्योगांची जोड हवी आहे. जोपर्यंत धुळे शहरात उद्योग-व्यवसायांना चालना मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास घडून येणार नाही. त्यासाठी शहरातील तरुणांच्या, कुशल मनुष्यबळाच्या हातांना काम उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठीच रावेर परिसरात नवीन औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरात उद्यमशीलतेला चालना मिळेल, असे प्रतिपादन आ.अनुप अग्रवाल यांनी केले.
शहरातील प्रभाग चारमधील जयहिंद कॉलनी व आनंदनगरला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत उद्यान विकासाचे काम सुरू आहे. त्या जागेत जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, एलईडी दिव्यांची सोय करण्यात येत आहे. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी विशेष पाठपुरावा करत नागरी दलितेतर निधीतून हे काम मंजूर करून घेतले होते. त्याचे भूमिपूजन आ.अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, माजी संघटनमंत्री यशवंत येवलेकर, देवपूर मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, राजे शिवाजी हेल्थ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. टी. देवरे, ॲड. एम. एस. पाटील, गुलाबराव पाटील, एस. एम. पाटील, प्रा. मोहन भदाणे, सी. एन. देसले, प्रा. बी. एन. पाटील, यशवंत गोसावी, निशा चौबे, चारुहास मोराणकर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. संजीव कुलकर्णी, संजय चोरडिया, प्रा. हर्षदीप पाटील, योगेश मोराणकर, प्रवीण बोरसे, भोजूसिंह राजपूत, निलेश राजपूत, दादा ठोंबरे, शेखर कुलकर्णी, नीरज अग्रवाल, संजय ठाकूर, अविनाश पाटील, यतीन पाटील, सीमा वाघ, वसुमती पाटील आदींनी संयोजन केले. सूत्रसंचालन अमोल चौधरी तर प्रा. सागर चौधरी यांनी आभार मानले.
२५ एकर जागेवर ‘श्रीराम सृष्टी’ साकारण्यास प्राधान्य
शहरातील नागपूर- सुरत बायपास रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ५१० मधील सुमारे २५ एकर जागेवर ‘श्रीराम सृष्टी’ साकारण्यास प्राधान्य दिले आहे. अशा थीम पार्कसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच त्याचे मोजमाप झाले आहे. महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर झाला आहे. तो मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे पाठविला जाईल. तेथे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही जागा मनपाकडे वर्ग होऊन कामास प्रारंभ होईल. यावर्षीच्या पावसाळ्यात जागेवर वृक्षारोपण केले जाणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह शहरवासियांनी तेथे वृक्षारोपणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आ.अग्रवाल यांनी केले.