आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांमधील भीती केली कमी
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांच्या आदेशावरून तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल देसले, डॉ.कांचन गायकवाड, तालुका मलेरिया सुपरवायझर अण्णा जाधव यांच्या सूचनेनुसार नेरी येथील प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकामार्फत डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. जामनेर तालुक्यातील नेरी दिगर, मोहाडी, मोरगाव याठिकाणी डॉ.कोमल देसले यांनी स्वतः भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन डेंग्यूबद्दल लोकांना माहिती देऊन जनजागृती केली. तसेच गावामध्ये गप्पी मासे कंटेनर सर्व्हे करून लोकांमध्ये डेंग्यू आजाराबद्दल असलेली भीती कमी करण्याचे काम नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले.
डेंग्यू दिवस जागृतीसाठी डॉ.गिरीश पाटील, आरोग्य निरीक्षक सोपान राठोड, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, गणेश पाटील, संदीप सावकारे, कृष्णा बाबर, गणेश शिंदे, पंकज गणवीर यांच्यासह प्रत्येक गावातील आशा सेविका, स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. यासाठी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
