दिव्यांगांसाठी जागतिक संधी अन्‌ समावेशाच्या दिशेने महत्त्वपूर्ण सुधारणा : आयुशी (आयएएस)

0
44

दिव्यांग दिनानिमित्त दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन विशेष चर्चासत्राला प्रतिसाद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

सर्व क्षेत्रात जवळपास दिव्यांगांना संधी उपलब्ध आहेत. शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्या आता दिव्यांग व्यक्तींना संधी देत आहेत. सर्व समावेशकता आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार अनुकूलता आणि सुलभता निर्माण होणे आवश्यक आहे. समाजात विविध इन्फ्रास्ट्रक्चर्स विकसित करणे आवश्यक आहे. अनेक संस्था यासंदर्भात प्रबोधन आणि प्रशिक्षण देत आहेत. ज्यामुळे संधी उपलब्ध होऊ शकतात. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जागरूकता निर्माण होणे, ॲक्सेसिबल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणामुळे दिव्यांगांना अडचणींवर मात करता येईल, अश्या भावना आयुषी (IAS) यांनी व्यक्त केल्या.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन विशेष चर्चासत्रात आयुषी, प्रज्ञाचक्षू (IAS) यांनी “विविध क्षेत्रांतील दिव्यांग व्यक्तींना असलेल्या संधी आणि अडचणी” विषयावर आपले विचार मांडले. यंदाच्या वर्षीची संकल्पना “समावेशक, शाश्वत आणि भक्कम भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या नेतृत्वाला बळकट करणे” ही आहे. या उद्दिष्टाला अनुसरून चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रणित गुप्ता, प्रज्ञाचक्षू (IIM उदयपूर), डॉ. कल्याणी लक्ष्मी, प्रज्ञाचक्षू (सीनियर बँक मॅनेजर, युनियन बँक ऑफ इंडिया), प्रियंका निकळजे, प्रज्ञाचक्षू (बँक प्रोबेशनरी ऑफिसर), पंकज महाजन, अस्थिव्यंग (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विसेस) आणि यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.

प्रास्ताविकात यजुर्वेंद्र महाजन म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती आमच्यासारख्याच आहेत; त्यांची क्षमता, कौशल्ये आणि स्वप्नेही तितकीच मोठी आहेत. त्यांना फक्त योग्य संधी, प्रेरणादायी वातावरण आणि सुलभता देणारी प्रणाली मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळते. फक्त त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि त्यांना उभारी देणे गरजेचे आहे.

दिव्यांगांना सुविधा सुधारण्यासाठी अनेक योजना

आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. कारण जगभर दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या संधींमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होत आहेत. देशात दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि न्याय व्यवस्थेतील सुविधा सुधारण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष धोरणे आणि कायदे तयार केल्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यास मदत मिळत आहे, अश्या भावना प्रणित गुप्ता याने व्यक्त केल्या. दिव्यांग व्यक्तींविषयी भेदभाव कमी होवून त्यांना समान संधी मिळत आहे, अश्या भावना पंकज गिरासे याने व्यक्त केल्या.

चर्चासत्रात जगभरातून २०० हून अधिक व्यक्तींचा सहभाग

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले. जगभरातून चर्चासत्रात २०० हून अधिक व्यक्तींनी सहभाग नोंदवला. ऐकू न येणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष साइन लँग्वेजच्या माध्यमातून भाषांतर करण्यात येत होते. चर्चासत्राची सुरुवात प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनी नाजनीन शेख हिने सादर केलेल्या ‘पानी सा निर्मल हो’ प्रार्थनेने झाली. सूत्रसंचालन तथा आभार ऋषिकेश किर्ती याने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here