संत मुक्ताईला घातले साकडे : वारकरी संप्रदायाचा आग्रह
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीची प्रशंसा करत संत मुक्ताईच्या चरणी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचीच निवड व्हावी, असे साकडे घातले आहे. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी आषाढी वारीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि निर्मल वारी मोहिमेत घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कौतुक केले.
ह.भ.प रवींद्र हरणे महाराज म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असणारे आणि वारकरी संप्रदायासाठी विशेष संवेदनशील असलेले नेते आहेत. ते तब्बल पाच वेळा मुक्ताईनगर येथे आले. प्रत्येकवेळी संत मुक्ताईच्या चरणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. असे करणे हा त्यांचा साधेपणाचा आणि श्रद्धेचा परिचय आहे.” ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात मुख्यमंत्रीपदावर असलेला नेता सहजासहजी भेटत नाही. पण शिंदे साहेबांसोबत असे घडत नाही. मी स्वतः नऊ वेळा त्यांच्या साक्षात्काराने लाभलो आहे. अशा व्यक्तीचे मुख्यमंत्रीपदासाठी योगदान कायम असावे, अशी आमची प्रार्थना आहे.”
महाआरती अन् साकडे
एकादशीच्या पूर्वसंध्येला संत मुक्ताई संस्थान फळा येथे आयोजित महाआरतीत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, टाळकरी आणि हजारो भाविकांनी सहभाग घेतला. महाआरतीनंतर मुक्ताईच्या चरणी “एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत,” अशी सामूहिक प्रार्थना केली.
निर्मल वारी अभियानातील उल्लेखनीय योगदान
आषाढी वारीदरम्यान निर्मल वारी अभियानासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे वारकऱ्यांनी कौतुक केले. “स्वच्छता आणि शिस्तबद्ध वारीचे उदाहरण मुख्यमंत्री शिंदे यांनी घालून दिले आहे. हे केवळ एक मुख्यमंत्रीच नव्हे, तर वारकरी परंपरेचे खरे सेवक असल्याचे दाखवते”, असे ह.भ.प.हरणे महाराज म्हणाले.
वारकऱ्यांचा पाठिंबा अन् विश्वास
संत मुक्ताई संस्थानाच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाने शिंदे यांच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमात सर्व स्तरातील वारकऱ्यांनी सहभाग नोंदवत त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला.
वारकरी परंपरेत शिंदे यांचा ठसा
आषाढी वारीपासून ते संत परंपरेच्या संवर्धनापर्यंत, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कार्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मनात त्यांच्या विषयी विशेष आदर आहे. “आम्ही मुक्ताईसाहेबांकडे फक्त साकडे घातले नाही, तर आपल्या संस्कृतीचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून श्रद्धेने मागणी केली आहे,” असे एका वारकऱ्याने सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला भावनिक जोड
वारकरी संप्रदायासाठी समर्पण, सहज उपलब्धता, आणि लोकाभिमुख निर्णयक्षमता यामुळे एकनाथ शिंदे यांना मिळणारा भावनिक पाठिंबा हे त्यांच्या नेतृत्वाचे विशेष लक्षण ठरले आहे. वारकरी संप्रदायाचे हे समर्थन त्यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासासाठी एक नवा अध्याय ठरू शकतो.