वरखेडला शेतकऱ्यांच्या आयोजित सत्काराप्रसंगी इंजि.कोमल तायडे यांचे प्रतिपादन
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
परिसरातील इतर शेतकऱ्यांनी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन प्रगती साध्य करावी, पुरस्कार मिळवावेत व असेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच पेरणीच्या वेळेआधी बियाणे महोत्सव घेण्याची इच्छा व्यक्त करत अशा कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन आर्थिक प्रगती साधावी. कुटुंबाचा, गावाचा मान वाढवावा व विविध पुरस्कारांना गवसणी घालावी, असे प्रतिपादन आयोजकांतर्फे एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या संचालिका इंजिनियर कोमल तायडे यांनी केले. सत्कारमूर्तींचा गुणगौरव करतांना त्यांनी शेतीत केलेल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करून समस्त पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सपत्नीक निवृत्ती पाटील-तायडे, सौ.तायडे, सचिन तायडे, इंजि. कोमल तायडे यांनी शाल, श्रीफळ, साडी-चोळीसह सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
वरखेडचे माजी सरपंच निवृत्ती पाटील यांच्या शेतात आयोजित महाराष्ट्र शासन पुरस्कृत वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी बाळकृष्ण पाटील, कंडारी २०१७ तसेच शिवाजी भाकरे, कंडारी २०२१ तसेच शेतकरी युवा पुरस्कार २०११ चे मानकरी प्रकाश भीमराव रणीत, कोकलवाडी अशा शेतकऱ्यांच्या सत्काराचे आयोजन सचिन तायडे, कपील राठी परिवाराच्यावतीने आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जलमित्र रामकृष्ण पाटील पोटा होते.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी नांदुरा तथा खामगावचे संदीप निमकर्डे, मंडळ कृषी अधिकारी सुनील पवार, कृषी पर्यवेक्षक गजानन निमकर्डे, निंबाई फुडस् अँड फॉडर्सचे संचालक कपिल राठी, शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या क्रांतिकारी उपक्रमाची सुरुवात करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश गावंडे, मोताळा पंचायत समितीचे माजी उपसभापती रावसाहेब देशमुख सपत्नीक उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी प्रगती करुन पुरस्कार मिळवावेत
बदलत्या हवामानामुळे संशोधनातून आलेले तंत्रज्ञान अवगत करून त्याचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या सहवासात राहून शेतकऱ्यांनी स्वतःची उन्नती करून घ्यावी, अशीच प्रगती करत पुरस्कार मिळवावेत आणि पुढच्यावर्षी या व्यासपीठावर ते बसलेले असावेत, अशी अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी व्यक्त केली.
सत्कारमूर्तींच्या हस्ते सपत्नीक पंचवृक्षाची लागवड
सुरुवातीलाच सत्कारमूर्तींच्या हस्ते सपत्नीक सर्व स्पर्शी पंचवृक्षाची लागवड करण्यात आली. त्यानंतर सत्कारमूर्तींचे शेतीमधील उत्पादने तसेच भानुदास वनारे यांच्या जैविक लॅबमधील त्यांनी स्वतः तयार केलेल्या निविष्ठा तसेच त्यांना मिळालेले सर्व पुरस्कारांचे प्रदर्शन, बाळकृष्ण पाटील यांच्या शेतीमधील सिताफळ, केळी, संत्रा, चिंच अशा फळांचे प्रदर्शनीचे उद्घाटन सत्कारमूर्तींच्या हस्ते करत शिवारफेरीचे आयोजन करून निवृत्ती पाटील यांच्या शेतीमधील विविध पिकांची लागवड, गांडूळ कल्चर युनिट, गाईंचा गोठा, एकात्मिक शेती पध्दतीवर आधारित उभी असलेली कपाशी पिकांची पाहणी करून, मुख्य कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, बळीराजांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
विविध उपक्रमांबद्दल शेतकऱ्यांंना दिली माहिती
सत्काराला उत्तर देतांना युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश रनित यांनी कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घेत, एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करत, कशी उत्पादनात भर पडते. तसेच कृषीपूरक व्यवसाय करतांना अधिकचा फायदा कसा मिळतो, हे सांगत असताना दुग्ध व्यवसाय, दाल मिल, शेडनेटमधील शेती आदी त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांंना माहिती दिली.
पुरस्कारार्थींनी व्यक्त केले शेतीमधील अनुभव
सेंद्रिय शेतीत आदर्श निर्माण करणारे भानुदास वनारे यांनी साध्या भाषेत मजेदार शैलीतून सर्वांची मने जिंकत टाळ्या मिळविल्या. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२१ चे मानकरी शिवाजी भाकरे यांनी त्यांच्या शेतीमधील पिकांबाबतीत तसेच शेतीत येणाऱ्या अडचणींबाबत तसेच पत्नीचे शेतीमधील सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त २०१७ चे पुरस्कार प्राप्त शेतकरी कंडारीचे बाळकृष्ण पाटील यांनी त्यांच्या शेतीमधील अनुभव शेतकऱ्यांना सांगितले.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाला नांदुरासह मलकापूर तालुक्यातील ३० ते ४० गावाचे प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निंबाई कंपनीची संपूर्ण टीम, वरखेड पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तसेच सत्कारमूर्तींचा परिचय कृषी सहाय्यक पुरुषोत्तम वनारे यांनी करुन दिला. सुत्रसंचलन अक्षय बोचरे तर सचिन तायडे यांनी आभार मानले.