मेंढोदे (खडकाचे) गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी : आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

0
29

कब्जा हक्काची रक्कम ५० रुपये चौरस मीटर प्रमाणे कमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांची झाली वचनपूर्ती

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

तालुक्यातील मेंढोदे (खडकाचे) हे गाव हतनूर प्रकल्पांतर्गत मेंढोदे गावाचे पुनर्वसन १९७३ मध्ये झालेले होते. २०१२ मध्ये भूखंड आकारणी झालेली होती. या भूखंडाचे एकूण क्षेत्र १३०७१.५१ चौरस मीटर आहे. यासाठी भूखंड धारकांना एकूण भरणा करावयाचे कब्जा हक्क रक्कम १०३ रुपये चौरस फुटाप्रमाणे होती. परंतु, गावातील भूखंड धारक हे हात मजूर असल्याने कब्जा हक्क रक्कम जास्त होत असल्याने कब्जाची रक्कम भरू शकत नसल्याने कुणीही भूखंड ताब्यात घेतले नव्हते. गावातील ११७ रहिवासी यांना भूखंड वाटप करण्याचा आदेश ६ मार्च २०१२ रोजी काढण्यात आला होता. गावातील गावकऱ्यांचा सुमारे बारा वर्षापासून हा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या पुनर्वसनाच्याबाबतीत आ.चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवून ४ ते ५ वेळेस बैठका पण घेतल्या होत्या. ४ मार्च २०२४ रोजी मेंढोदे या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. सभाही झाली होती. त्यामुळे आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मेंढोदे (खडकाचे) गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कब्जा हक्काची रक्कम ५० रुपये चौरस मीटर प्रमाणे कमी असणार आहे.

पुनर्वसन विभागातून निघाला सुधारित आदेश

यावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्याकडे रखडलेल्या पुनर्वसनाच्या संदर्भात मागणी केली होती.त्यांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. याबाबत आ.चंद्रकांत पाटील यांनी सतत पुनर्वसनासंदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून पूर्वीची १०३ रुपये चौरस फुटाप्रमाणे कब्जा हक्क रक्कम आता ५३ रुपये चौरसफुटाप्रमाणे भूखंड धारकांना भरणा करावयाची आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा महसूल व वनविभाग शासन परिपत्रक शासन निर्णयानुसार मेंढोदे येथील भूखंड धारकांच्या कब्जा हक्क रकमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागातून सुधारित आदेश काढण्यात आलेला आहे.

उर्वरित ३२ घरांचे पुनर्वसनावावर लवकरच सकारात्मक निर्णय

गेल्या बारा वर्षापासून ग्रामस्थांच्या हक्काची जागा त्यांना कब्जा हक्क रक्कम जास्त असल्याने पैसे भरता येत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी ग्रामस्थांसमवेत याच गावात ४ मार्च रोजी मेंढोदे ते सुलवाडी पुलाच्या भूमिपूजन आणि सभेसाठी आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी याबाबत सुधारित आदेश काढला. तसेच याच गावातील उर्वरित ३२ घरांचे पुनर्वसनावावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल.

ग्रामस्थांमध्ये आनंदासह उत्साहाचे पसरले वातावरण

यावेळी ग्रामस्थांनी शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आ. चंद्रकांत पाटील यांचे जल्लोषात स्वागत करून गावात सत्काराचा कार्यक्रम घेतला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे पूर्वीची जास्तीची कब्जा हक्क रक्कम आता निम्म्यावर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पुनर्वसन सोपे झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदासह उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here