मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यालयाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ठोकले कुलूप

0
24

गटविकास अधिकारी दवाखान्यात

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

तालुक्यातील पंचायत समिती विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ लाभार्थींना मिळत नसून ग्रामसभेतील मंजुरी यादी घेतली जात नाही. घरकुले, गोठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पंचायत समितीत पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा गटविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोप करीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी २४ सप्टेंबर सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी राज्य सचिवांची बैठक न घेता ग्रामसेवकांची बैठक घेत आहेत, असा टोला आ.चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये घरकुल, गोठे, एमआरइजीएस व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बैठक आयोजित केलेली होती. बैठकीत खासदार खडसे यांनी पंचायत समितीत लाभार्थ्यांना लाभ मिळत नसून त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करीत ग्रामसभेत ठराव झालेल्या मंजुरी याद्या प्रकरणे घेतली जात नाही. जो पैसे देतो त्याचेच काम होते, अशा प्रकारचा बाजार पंचायत समितीत कारभार सुरु आहे. त्यामध्ये गटविकास अधिकारी व सर्व ऑपरेटर यांच्या संगनमताने ही कामे होत आहे. त्याला कोणताही वचक किंवा वरिष्ठांचा धाक नसल्याचे दिसून येत असल्याचे खडसे यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.

गटविकास अधिकारी निशा जाधव या कुठल्याही प्रकारचे उत्तर देऊ शकल्या नाही. तसेच त्या तक्रारींचे निवारण करत नाही. ग्रामसेवक यांची दरमहा बैठक घेत नसल्याचेही खडसे यांनी सांगितले. याप्रकरणी मंत्रालयातील अधिकारी एकनाथ डवले व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून खासदार रक्षा खडसे यांनी गटविकास अधिकारी निशा जाधव यांना निलंबित करा किंवा त्यांना जिल्हा परिषदेत जमा करा, मुक्ताईनगर येथे चांगले अधिकारी द्या, असे सांगितले. जोपर्यंत गटविकास अधिकारी निशा जाधव यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा राज्यमंत्री खडसे यांनी घेतलेला आहे.

राज्यमंत्री यांच्या कारवाईमुळे मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निशा जाधव यांचे ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पत्रकारांनी दवाखान्यात गटविकास अधिकारी जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, खासदार खडसे म्हणतात ‘माझ्या घरी यायची तुम्हाला लाज वाटते का? तसेच बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर मला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच पंचायत समिती माझी आहे, बाहेर निघा’ असेही त्या म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले.

या प्रकरणाविषयी आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारल्यावर त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री यांचे काम काय ते ग्रामसेवकांची बैठक घेत आहेत. सत्तेमध्ये असताना मंत्री आंदोलन करताय मग फायदा कोणाला होणार सत्तेला की विरोधकाला, असा टोला त्यांनी हाणला. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी गटविकास अधिकारी यांची दवाखान्यात जात विचारपूस करीत तब्येतीची माहिती घेतली. आम्ही तुमच्यासोबत आहोत काही काळजी करू नका. तसेच लोकांची कामे होण्यासाठी लावलेले पंचायत समितीला लावलेले कुलूप उघडा किंवा तोळा तसेच ते कुलूप उघडू देऊ नसल्यास त्यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करा, असे आ.पाटील यांनी गटविकास अधिकारी जाधव यांना सांगितले.

अन्‌ अधिकारी पोहोचले मुक्ताईनगरात….

राज्यमंत्री खडसे यांनी पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर जळगाव येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजू लोखंडे तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील हे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये पोहोचले होते. मुक्ताईनगर येथील खा.कार्यालयात अधिकाऱ्यांनी राज्यमंत्री खडसे यांची भेट घेत माहिती जाणून घेतली. तसेच दवाखान्यात उपचार घेत असलेल्या गटविकास अधिकारी जाधव यांची तब्येतीची त्यांनी विचारपूस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here