ग्रामस्थ, मित्रमंडळी, नातेवाईकांनी ‘वैभवची’ गावातून मिरवणूक काढून केले भव्य स्वागत
साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी :
परिस्थिती संघर्ष करायला शिकवते. कष्टाची भाजी, भाकर नवनवीन अनुभव देते. अशाच शेतकरी आई-बापाच्या कष्टाच्या फळामुळे मुलाने सीमा सुरक्षा बल (BSF) कॉन्स्टेबल पदाला गवसणी घातली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना गुजरातमधील गांधीधाम येथील ग्राउंडमध्ये यशस्वी होऊन, लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवून सीमा सुरक्षा बलमध्ये निवड झालेल्या पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील वैभव ईश्वर चौधरी युवकाची ग्रामस्थ व नातेवाईकांच्यावतीने मिरवणूक काढून भव्य सत्कार करण्यात आला.
ईश्वर फकीरा चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या काळ्या आईची सेवा करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन मुलांना शिकविले. मुलगी खासगी कंपनीत इंजिनियर आहे. बारावी झाल्यानंतर वैभवने फार्मसीचे शिक्षण घेण्याचे ठरविले. परंतु देश सेवा करण्याची आवड असल्याने त्याने फार्मसीबरोबरच गेल्या तीन वर्षांपासून सैनिक होण्याचे स्वप्न पाहून अभ्यासक्रम सुरू केला होता. मात्र, त्याला पहिल्याच प्रयत्नात देशसेवा करण्यासाठी यश प्राप्त झाले आहे. वैभवने कॉन्स्टेबल (BSF)पदी गवसणी घातली आहे. आता आसाममधील मणिपूर येथे सेवा देत आहे.
आई-वडिलांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू…!
मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा औक्षण करताना आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. खऱ्या अर्थाने मुलाने आई-वडिलांच्या कष्टामुळे म्हणून गावातील नातेवाई, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांनी वैभवच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच वैभवची संपूर्ण गावातून देशभक्तीपर गीत लावून, फटाके वाजवून, गुलालाची उधळण करत मिरवणूक काढत देशाचा ‘सैनिक’ झाला म्हणून जल्लोष साजरा केला.