विद्यार्थ्यांना जयेश पाटील यांनी केले मार्गदर्शन
साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी :
येथील नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा म्युन्सिपल हायस्कुल येथे आयोजित केली होती. कार्यशाळेत विद्यार्थी व शिक्षक यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शाडू मातीपासून कशी तयार करावी. याविषयी जयेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे किती महत्त्व आहे, हे सांगितले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगापासून पर्यावरणाची होणारी हानी किती घातक आहे. त्याचीही माहिती दिली. गणेशमूर्ती कशी तयार करावी, त्याचेही प्रात्यक्षिक करून दाखविले.
शाडू मातीपासून बनविलेली गणपतीची मूर्ती प्रत्येकाने बसवावी, असे आवाहन करण्यात आले. हा कार्यक्रम मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी मुख्याध्यापक के.टी.तळेले, पालिकेच्या अधीक्षक एम.डी.कुटे, प्रवीण सपकाळे, भारती बोके, आकाश रल, पाणीपुरवठा अभियांता ऋतुजा पाटील, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.