मुक्ताईनगर बस स्टँड बनतोय ‘रोडरोमिओंचा’ अड्डा

0
32
oppo_0

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांची सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

येथील बस स्टँड परिसर सध्या ‘रोडरोमिओंचा’ अड्डा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी हा परिसर चिंतेचा विषय बनला आहे. बस स्टँडवर नियमितपणे प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोर मुलांच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात मुलींवर होणाऱ्या हत्याचार आणि अत्याचारांच्या घटनांचा आलेख वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरच्या भागातही विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बस स्टँडजवळ टवाळखोर मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलांचा उद्देश फक्त चेष्टा-मस्करी न करता, विद्यार्थिनींचा त्रास वाढविणे असा आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नसल्याचेही विद्यार्थी सांगत आहेत. परिणामी, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. बस स्टँडच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी पालकांमधून मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते. परंतु, बस स्टँडवरून गावाकडे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुरक्षेचे प्रश्न अद्यापही सोडवले गेलेले नाहीत.

पालकांनी पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर त्वरित कार्यवाही होण्याची मागणी केली आहे. पालकांच्या मते, बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षेची हमी मिळेल आणि टवाळखोर मुलांचा त्रास कमी होईल. हा प्रश्न केवळ एकत्रित समाजाच्या सुरक्षिततेचा नसून मुलींच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा आहे.

तरुणींसह महिलांच्या मनात वाढले भीतीचे प्रमाण

शाळा अथवा कॉलेज भरण्याच्या वेळेस अथवा सुटण्याच्या वेळेस रस्त्याच्या बाजूने पाई चालत असताना काही टवाळखोर रोडरोमीओ मुलींच्या जवळून मोठंमोठी लावलेली हॉर्न वाजवत अथवा दुचाकी मुलींच्या मागे स्पीडने आणत अचानक ब्रेक लावत टवाळखोऱ्या करतात. तसेच दुचाकीला लावलेले सायलेन्सरच्या विचित्र कर्कश आवाजाने तरुणी आणि महिलांच्या मनात भीतीचे प्रमाण वाढले आहे. अशा विचित्र आवाजाच्या सायलेन्सर व हॉर्न असलेल्या दुचाकी वाहनाना पोलीस प्रशासनामार्फत आळा बसणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याबाबतीत तातडीने पोलीस प्रशासनाने कार्यवाही करून परिसरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांसह पालकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

माहिती दिल्यास संबंधितांवर कारवाई करणार

विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांना तालुक्यातील कुठेही कुठल्याही शाळकरी तरुणी अथवा महिला यांच्या संदर्भात अत्याचार होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. असे काही कृत्य तालुक्यामध्ये कुठे होत असल्यास माझ्या मोबाईल नंबर 8010455219वर कॉल करा. आपल्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्यात येईल. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

-नागेश मोहिते, पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here