नियमित शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले

0
66

वेतन देयकांवर शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी सणांच्या आनंदावर पडले ‘विरजण’

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर एक आठवडा उलटूनही शासनाद्वारा कुठल्याही अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती न झाल्याने जिल्ह्यातील दोन हजार २०० उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन रखडले आहे. वेतनाचा तिढा सुटण्यासाठी तात्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कायमस्वरूपी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या पोळा, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन देयकांवर शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी सणांच्या आनंदावर ‘विरजण’ पडले आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची देयकेही स्वाक्षरीअभावी प्रलंबित आहेत.

शिक्षकांचे नियमित वेतन रखडल्याने गृहकर्ज हप्ते तसेच आजारपणाचा खर्च यासंदर्भात आर्थिक संकटाचे मळभ गडद झालेले आहे. जिल्ह्यातील सुमारे १०२ अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांसमोर वेतनाचा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. यासंदर्भात नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी त्वरित लक्ष घालून शासन स्तरावर प्रयत्न करून जळगाव जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवून जिल्ह्यातील असंख्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा, असे साकडे जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील (ज्येष्ठ मार्गदर्शक), प्रा.शैलेश राणे प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष), डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष) यांनी घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here