मुस्लिम समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला निवेदन
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी:
संपूर्ण इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद (स) यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांचा व संपूर्ण इस्लाम समाजाचा अपमान करणारे एवढेच नव्हे तर इस्लाम धर्माचा अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून टीका करणारे रामगिरी महाराज यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील एकही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला नाही. म्हणून जळगावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पाचोरा वासियांच्या तीव्र भावना निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यात एका तरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
याप्रकरणी अभ्यास करून व माहिती जमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने शिष्टमंडळाला दिले आहे. रामगिरी महाराजांवर गुन्हा नोंदवून त्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने तक्रार अर्जात नमूद केले आहे. यावेळी मौलाना हाफिज नईम रजा. अल्ताफ मौलाना, एजाज मौलाना, हाफिज अझहर यांच्यासह हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.