साईमत / जळगाव / प्रतिनिधी
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे विद्यार्थी पुस्तके विसरले आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची आवड निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने हिंदी मराठी विभागातर्फे मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मेहरूण येथे पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये शालेय ग्रंथालयातील सर्व हिंदी व मराठी विषयांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी करून या शैक्षणिक वर्षात वाचण्याची शपथ घेतली. पुस्तक मैत्री आणि हिंदी-मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हिंदी मराठी विभागाने या प्रदर्शनाची जबाबदारी घेतली.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शेख हफीज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमात मराठी विभागाचे प्रमुख शेख वसीम, हिंदी विभागाच्या प्रमुख समिना मॅडम व इतर सदस्य मेहरुन्निसा मॅडम, शेख नसीमा मॅडम, शेख अजहर सर यांनी सहभाग घेतला.
शाळेचे ग्रंथपाल आदिल खान यांनी प्रदर्शनासाठी विशेष सहकार्य करून विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख हाफीज मणियार, पर्यवेक्षक सय्यद मुख्तार यांनी मार्गदर्शन केले.