चार दिवसात दुसरी कारवाई, गुटखा माफीयांचे धाबे दणाणले
साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर :
मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांच्या पथकाने मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर सापळा रचून चार लाख 38 हजारांच्या गुटख्यासह वाहन असा 22 लाख 38 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, चार दिवसात झालेल्या दुसऱ्या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहे. याप्रकरणी चालक अजीज शेख याला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर असे की, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने गेल्या 20 जुलै रोजी मुक्ताईनगर येथे 76 हजाराचा अवैधरित्या वाहतूक होत असलेला गुटखा पकडला होता. चार दिवसांनी २४ जुलै रोजी मुक्ताईनगरचे डीवायएसपी आर.एम.शिंदे यांना एका काळ्या रंगाची महेंन्द्रा स्कॉरपिओ गाडीतून गुटखा मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. डीवायएसपी शिंदे यांच्या पथकाने सायंकाळी साडेसात वाजता सापळा रचला होता.
मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर पथकाची कारवाई
मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या काळ्या रंगाची महेंन्द्रा स्कॉर्पिओ गाडीला (क्र. एम.एच. 27 डी.एल. 2496) मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर थांबवून वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यामध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखु व गुटखा वाहतूक करुन घेऊन जात असल्याचे आढळून आले. वाहन चालकास त्याचे नाव, गाव विचारले. तेव्हा त्याने अजीज शेख बाबु (वय 36, रा. झॉसी नगर, रिसोड, ता. रिसोड, जि. वाशिम) असे सांगितले. तपासणीत वाहनात पोलिसांना चार लाख 38 हजारांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी पो.कॉ. विजय कचरे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक अजिज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पथकात यांचा होता समावेश
कारवाई केलेल्या पथकात उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. राहुल बोरकर, राजेंद्र खनके, पो.हे.कॉ. छोटु वैद्य, पो.ना.कॉ.देवसिंग तायडे, पो.कॉ.विजय कचरे , विशाल सपकाळे, निखील नारखेडे यांचा समावेश होता.