साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर :
तालुक्यातील अनुराबाद राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी कोळेकर, अनुराबाद येथील कृषी सहाय्यक जी.डी. नमायते, सरपंच ज्ञानदेव ढगे, उपसरपंच निलेश फिरके, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक किरण अहिरे, अनिल मास्कर, प्रकाश चव्हाण, कृषी मित्र तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषी सहाय्यक जी.डी. नमायते यांनी शेती शाळेची प्रार्थना घेऊन मागील शाळेचा आढावा घेऊन सोयाबीन, कापूस, तूर पिकांना शिफारशीनुसार लागणारी खताची मात्रा कशी काढावी, किती द्यावी व कशी द्यावी, अतिरिक्त खताचा वापर कसा टाळावा, विद्राव्य खतांचा वापर तसेच दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच दशपर्णी अर्क फवारणीचे महत्त्व समजावून सांगितले. सर्व शेतकऱ्यांनी घरच्या घरी दशपर्णी अर्क तयार करावा, असे आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी यांनी सोयाबीन पिक एकात्मिक व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडविषयी माहिती देऊन एक रुपयात पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. सर्वात शेवटी शेतकऱ्यांनी आयसीएम टाळी वाजवून शेतीशाळेची सांगता केली.