बोहर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान

0
27

साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव :

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, बोहर्डीचे सरपंच विशाल सोनवणे यांनी पूल बांधतांना पाईपांच्या पुलाप्रमाणे तिरपा बांधा, असे सांगितले होते. परंतु, याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने खिरोदा – वाकोद राज्य मार्ग क्रमांक ४६ वर भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ उन्हाळ्यात पुलाचे बांधकाम केले आहे. मात्र, हा पूल पूर्वी असलेल्या नाल्याच्या प्रवाहाच्या वेगळ्या पद्धतीने बांधला आहे. नाल्याचे पाणी थेट तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच पूल बांधताना एका शेतकऱ्याच्या शेतात ठेकेदाराने बांधकामांचे मटेरियल टाकून व रस्ता बनवून त्याचे नुकसान केले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पसरला असंतोष

वेळोवेळी शेतकऱ्यांनी सांगूनही पुलाला उंच संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . पूल बांधकामावेळी ठेकेदार १५ फुट उंच संरक्षक भिंत बांधून देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शेतकऱ्यांचे आठ महिने शेत वापरूनही त्याचा काहीही मोबदला मिळाला नाही . याउलट शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी जाऊन पिकांचे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष

संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व वरिष्ठांपर्यत निवेदन देऊनही अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे दिनेश सपकाळ, मोहनसिंग पाटील, निलेश पाटील आदी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने याबाबत त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here