साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर ।
वरखेड येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह संभाजी शिर्के यांनी दाताळा उपकेंद्रावर रात्री ९ वाजता धडक देत रात्री अभियंत्यांना जाब विचारत ताबडतोब वीज पुरवठा सुरू झाला पाहिजे, यासाठी यंत्रणा कामाला लावण्याची विनंती केली. त्याची दखल घेत अभियंत्यांनी ताबडतोब यंत्रणा कामाला लावून रात्री वरखेड शिवारातील वीज पुरवठा सुरू केला. तसेच दुसऱ्या दिवशी कंत्राटदार आणि एमएसईबीचे कर्मचारी मिळून पूर्ण फिटरचे मेन्टेनन्स केल्या जाईल, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली. पूर्ण फिटरची मेन्टेनन्स होऊन व्यवस्थित मार्गी न लागल्यास नंतर आक्रमक आंदोलन करण्यात येईल, अशा पद्धतीचा इशारा संभाजी शिर्के यांनी अभियंत्यांना दिला होता. यावेळी वरखेड येथील सरपंचासह ३० ते ४० युवक उपस्थित होते.
गेल्या वीस ते पंचवीस दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत पोल पडून वरखेड लासुरा शिवारातील अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्याची पुनःउभारणी करत वीज पुरवठा सुरू होऊन वीस दिवस उलटून गेले तरी मेन्टेनन्सअभावी थोडी जरी हवा पाणी सुरू झाले तरी लासुरा वरखेड शिवारात वीज लगेच गुल होते. हा सपाटा गेले जवळजवळ २५ दिवस झाले तरी तसाच सुरू आहे. सायंकाळी थोडा वारा,पाणी सुरू झाला की, लाईट बंद होणे आणि दोन्ही गावांना रात्र अंधारात काढावी लागते. गेल्या चार रात्री अशाच पद्धतीने अंधारात गेल्यानंतर मात्र येथील नागरिकांनी ही माहिती संभाजी शिर्के यांना दिली होती.
