गरीब विद्यार्थी सहायता निधीतून दिला मदतीचा हात

0
34

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

दातृत्व हा एक अलौकिक असा सद्गुण आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या बालमनावर दातृत्वाचा संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात होत आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातांना दातृत्वाच्या सुगंधाचा स्पर्श होऊन त्यांच्यातील माणुसकी जोपासली जात असल्याच्या प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.

वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आपल्या मित्रांना, शिक्षकांना चॉकलेट किंवा खाऊचे वाटप करतात. परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी जर काही मदत केली तर नक्कीच ती उपयोगी ठरू शकते, ही संकल्पना शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांनी राबविली. त्यांनी वाढदिवसानिमित्त दोन वर्षांपूर्वी शाळेला गरीब विद्यार्थी सहायता निधी पेटी भेट देऊन उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या दोन वर्षांत गरीब विद्यार्थी सहायता निधीच्या माध्यमातून विष्णू गणेश कुमावत (हिवरखेडा), वैष्णवी दत्तू घोंगडे, खुशी ज्ञानेश्‍वर घोंगडे, प्रतीक संजय पडोळ (लोंढ्री) यांच्यासह गरजू विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी भरीव मदत झालेली आहे. खर्चाणे येथील गरजू विद्यार्थ्यांना चप्पल, बूटाचे वाटप केले आहे.

असा आहे उपक्रम

विद्यार्थी, शिक्षक आपल्या वाढदिवसानिमित्त पेटीत यथाशक्ती रोख स्वरूपात देणगी टाकतात. तसेच शाळेत येणारे अभ्यागत, पालक आपल्या शाळा भेटीवेळी पेटीत स्वेच्छेने यथाशक्ती देणगी टाकतात. मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, लिपिक प्रकाश जोशी आणि गरीब विद्यार्थी सहायता निधी वितरण प्रमुख हरिभाऊ राऊत यांच्या समन्वयातून गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत, शैक्षणिक गरज तसेच पालकांच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत निधी दिला दिला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here