यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश अति तापमानाच्या निकषात करा

0
48

साईमत, यावल : प्रतिनिधी

अति तापमानाच्या निकषात यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश करण्याबाबत यावल रावेर तालुक्याचे भावी नेतृत्व तथा उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी, १२ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. रावेर विधानसभा मतदार संघातील भावी उमेदवार तथा शेतकरी आणि आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय शिरीष चौधरी (खिरोदा) यांच्यासह लीलाधर विश्‍वनाथ चौधरी (भालोद), सती हरिश्‍चंद्र पाटील (बोरावल खु.), ज्ञानेश्‍वर श्रीधर बऱ्हाटे (पाडळसे), केतन दिगंबर किरंगे (फैजपूर), भूषण घनश्‍याम भोळे (हिंगोणा) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यावल व रावेर तालुक्यात केळी मुख्य पिक आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले गेले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली होती. उष्णतेचा पारा ४५ अंश सेल्सियशच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे अति तापमानामुळे यावल व रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

यावल तालुक्यातील महसूल मंडळांच्या शासकीय किंवा इतर हवामान यंत्रांचा अहवाल मागवून अहवालाची तापमानानुसार तपासणी करण्यात यावी आणि त्यानुसार विमा कंपनीच्या हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेअंतर्गत अति तापमानाच्या निकषात यावल तालुक्यातील सर्व मंडळांचा समावेश करुन शेतकयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कंपनीला आदेश करावा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here