साईमत, पुणे : विशेष प्रतिनिधी
राज्याच्या कृषी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार रावसाहेब भागडे यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तपदावरून डॉ. प्रवीण गेडाम यांची ३१ मे रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस कृषी आयुक्तपदाची जागा रिक्त ठेवली गेली. आयुक्तांची बदली करुन ऐन खरिपात कृषी विभाग वाऱ्यावर सोडण्यात आल्याची टीका होत होती. शेवटी या पदाचा तात्पुरता कार्यभार श्री. भागडे यांच्याकडे देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले.
आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे कोणाला द्यावीत याचे अधिकार कृषी खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांच्याकडे होते. त्यानुसार आदेश होऊन अवर सचिव अ.नि.साखरकर यांनी भागडे यांच्या नावाचा आदेश सोमवारी (ता. ३) सायंकाळी जारी केला. यापूर्वी तत्कालीन कृषी आयुक्त धीरज कुमार रजेवर असता आयुक्तपदाची सूत्रे राज्य शासनाने श्री. भागडे यांच्याकडे दिली होती. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शेती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. श्री. भागडे राज्याच्या चारही कृषि विद्यापीठांचे नियंत्रण करणाऱ्या महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत.



