साईमत, रावेर : प्रतिनिधी
एकीकडे विविध समस्यांनी केळी उत्पादक आधीच चिंताग्रस्त झालेला असतांना शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनाने करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
रावेर तालुक्यात शनिवारी, २५ मे रोजी सायंकाळी जोरदार वादळाचा फटका बसला. त्यात प्रामुख्याने अटवाडा, दोधे, नेहते, अजनाड आदी गावांच्या शिवारांमधील केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. वादळात हजारो हेक्टर जमीनीवरील केळीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
यंदा केळी उत्पादकांच्या समोर अनेक अडचणी आल्या आहेत. आधीच केळी पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नाडविण्याची भूमिका घेतली. यानंतर अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक अक्षरश: निराश झाले आहेत. त्यातच आता वादळी वाऱ्यांमुळे केळीची हानी झाली आहे. तहसीलदार बंडू कापसे यांनी काल सायंकाळीच नुकसानीची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.