साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
पहूर पेठ, पहूर कसबेसह सांगवी या तीन गावांची तहान भागविणाऱ्या गोगडी धरणाने तळ गाठलेला असताना ‘आ’ वासून उभे राहिलेले पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईच्या मागणीची दखल घेत सोमवारी, २० मे रोजी दुपारी १२ वाजता लघु पाटबंधारे उपविभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी गोगडी प्रकल्प गाठत पाहणी केली. यावेळी वीज पंपांद्वारे अवैधरित्या हजारो लिटर पाण्याचा उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांंनी पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः आपले वीज पंप काढून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, ग्रामपंचायत सदस्य पती सुभाष धनगर, चेतन रोकडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे गावात मोटारी काढण्यासंदर्भात दवंडीद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे शंकर जाधव यांनी सांगितले.